उपचारासाठी रत्नागिरीला नेताना वाटेतच महिलेचा मृत्यू
मुरुड येथील घटना
दापोली : पाय दुखणे आणि सूज आल्याने उपचारासाठी नेण्यात येत असलेल्या एका ६५ वर्षीय महिलेचा वाटेतच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अरुणा अरविंद भोसले (वय ६५, रा. मुरुड, ता. दापोली) असे मृत महिलेचे नाव असून, चिपळूणजवळील कामथे येथे रुग्णवाहिकेतच त्यांची प्राणज्योत मालवली.
मयत अरुणा भोसले यांच्या पायाला सूज आल्याने आणि पाय दुखत असल्याने त्यांचे जावई राजेंद्र जगन्नाथ जाधव यांनी त्यांना औषधोपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे दाखल केले होते. मात्र, त्यांची प्रकृती पाहता येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालय रत्नागिरी येथे हलवण्याचा सल्ला दिला.
शुक्रवारी, २० फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून दापोलीहून रत्नागिरीकडे नेण्यात येत होते. रुग्णवाहिका चिपळूण तालुक्यातील कामथे गावाजवळ पोहोचली असता, अचानक अरुणा भोसले यांची हालचाल आणि श्वासोच्छवास बंद झाला. हे लक्षात येताच राजेंद्र जाधव यांनी त्यांना तातडीने पुन्हा उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे आणले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच दापोली पोलिसांनी या प्रकरणाची नोंद घेतली आहे. २० फेब्रुवारी २०२६ रोजी या घटनेबाबत अकस्मात मृत्यू क्रमांक १४/२०२६, बी.एन.एस.एस. १९४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.