पेढे उड्डाणपुलावर डिझायरची एसटी बसला धडक
चिपळूण:
मुंबई-गोवा महामार्गावरील पेढे उड्डाणपुलावर एका भरधाव कारने समोरून येणाऱ्या एसटी बसला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात कार चालकासह दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, कार चालकाकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसल्याचे तपासात उघड झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी मध्यरात्री हा अपघात घडला. आरोपी चालक गणेश गोपीनाथ राजेशिर्के (वय ४३, रा. कुडूप पलीकडची वाडी, चिपळूण) हा आपल्या ताब्यातील मारुती स्विफ्ट डिझायर कार (MH-12-NP-6682) घेऊन गोवा ते मुंबईच्या दिशेने जात होता.
पेढे उड्डाणपुलावर रस्ता दुभाजकामुळे वाहतूक एकाच लेनवरून सुरू असताना, आरोपीने समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात आपली कार चुकीच्या बाजूने नेली. यावेळी मुंबईकडून येणाऱ्या एसटी बसला (MH-14-LX-7152) कारने समोरून चालकाच्या बाजूला जोरदार धडक दिली.
विनापरवाना वाहन चालविल्याचा ठपका
या अपघातात कार चालक गणेश राजेशिर्के याला किरकोळ दुखापत झाली असून दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, आरोपीकडे वाहन चालविण्याचा वैध परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) नसतानाही त्याने हायवेवर बेदरकारपणे गाडी चालवून हा अपघात घडवून आणला.
याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल पांडुरंग शिवाजी पाटील यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी १९ फेब्रुवारी रोजी आरोपी विरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम २८१, १२५(अ) आणि मोटार वाहन कायदा कलम ३/१८१, १८४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.