कौटुंबिक वादातून तरुणाची गळफास लावून आत्महत्या
नातुंडे-मावळंगे येथील हृदयद्रावक घटना
रत्नागिरी:
तालुक्यातील नातुंडे (मावळंगे) येथे एका ३६ वर्षीय तरुणाने राहत्या घरी अंगणात गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या नशेत झालेल्या वादातून हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीवरून समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत दत्ता मारुती पाटील (वय ३६) हा १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास दारू पिऊन घरी आला होता. घरी आल्यानंतर त्याने पत्नी सायली दत्ता पाटील यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली.
हा वाद विकोपाला जात असताना दत्ताची आई शारदा पाटील यांनी मध्यस्थी केली आणि त्याला समजावून घराबाहेर अंगणात पाठवले. मात्र, बाहेर गेल्यानंतर दत्ताने घराचा दरवाजा बाहेरून कडी लावून बंद केला. त्यानंतर अंगणातील लोखंडी बारला नायलॉनची दोरी बांधून त्याने स्वतःला गळफास लावून घेतला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद अकस्मात मृत्यू क्र. ६/२०२६ अशी करण्यात आली आहे.
दारूच्या व्यसनामुळे एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा आधार गेल्याने नातुंडे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.