शिरगाव येथे घरफोडीत १ लाखाचा मुद्देमाल लंपास
रत्नागिरी:
शहरातील शिरगाव परिसरातील शिवसृष्टी अपार्टमेंटमध्ये भरदिवसा घरफोडीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्याने बंद फ्लॅटचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण १ लाख ५ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
शिरगाव येथील बाणखिंड परिसरातील वसुंधरा बिल्डिंगमधील ‘शिवसृष्टी अपार्टमेंट’मध्ये राहणाऱ्या सौ. स्मिता संतोष सुर्वे (वय ५३) या १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७:०० वाजता घराला कुलूप लावून परकार हॉस्पिटल येथे नोकरीसाठी गेल्या होत्या. दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास त्या घरी परतल्या असता, त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश केला असता, बेडरूममधील लोखंडी कपाटाच्या लॉकरमधील दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
चोरट्याने सोन्याची ठुशी: ५ ग्रॅम, सोन्याची अंगठी: ६ ग्रॅम, सोन्याचे कानातले जोड: ५ ग्रॅम, सोन्याचे छोटे कानातले: ३ ग्रॅम, रोख रक्कम या वस्तू लंपास केल्या आहेत.
या प्रकरणी स्मिता सुर्वे यांनी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (अ) आणि ३३१ (३) नुसार गुन्हा रजिस्टर नंबर ४१/२०२६ दाखल केला आहे. दिवसाढवळ्या झालेल्या या घरफोडीमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून, पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.