शेकोटी घेताना भाजलेल्या महिलेचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू
गुहागर:
घरच्या चुलीजवळ शेक घेत असताना साडीला आग लागून गंभीर भाजलेल्या अंजनवेल येथील एका ५१ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रजनी रघुनाथ संगमेश्वरकर असे या मृत महिलेचे नाव असून, मुंबईतील केईएम रुग्णालयात १७ दिवसांच्या झुंझीनंतर त्यांची प्राणज्योत मालवली.
मिळालेल्या माहितीनुसार, रजनी संगमेश्वरकर या गुहागर तालुक्यातील अंजनवेल येथील रहिवासी होत्या. १७ जानेवारी २०२६ रोजी त्या आपल्या राहत्या घरी चुलीजवळ बसून शेक घेत होत्या. यावेळी त्यांच्या साडीने अचानक पेट घेतला. ही आग इतकी वेगाने पसरली की त्यांच्या पाठीला आणि दोन्ही पायांच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाली. त्यानंतर स्थानिक डॉक्टरांकडे प्राथमिक उपचार केल्यानंतर, त्यांना अधिक उपचारांसाठी मुंबईतील के.ई.एम. रुग्णालयात दाखल करण्यात आले. ४ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले
मुंबईतील भोईवाडा पोलीस ठाण्याकडून या घटनेची कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर, रत्नागिरीत आकस्मिक मृत्यू क्रमांक ०६/२०२६ नुसार १६ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थंडीच्या दिवसांत शेकोटीचा वापर करताना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.