लोटेतील ‘लक्ष्मी ऑरगॅनिक’ विरोधात रणशिंग
कोकण पर्यावरण संघर्ष समितीचा भव्य मोर्चाचा इशारा
चिपळूण: खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनी विरोधात कोकण पर्यावरण संघर्ष समितीच्या माध्यमातून लवकरच परिषद घेऊन भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती माजी खासदार हुसेन दलवाई यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या आंदोलनाच्या तयारीसाठी गावागावांत सुरू असलेल्या बैठकींना ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
दलवाई म्हणाले, “सरकार व अधिकाऱ्यांच्या आशिर्वादानेच ही कंपनी सुरू झाली असून येथे घातक पीपासचे उत्पादन घेतले जात आहे. याची पूर्ण कल्पना सरकारला आहे. काही दिवसांपूर्वी येथे भेट दिलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कंपनी कोकणसाठी हानिकारक ठरत असल्यास ती बंद केली जाईल, असे सांगितले. मात्र प्रत्यक्षात तसे काही घडताना दिसत नाही. कंपनी घातक आहे की नाही, हे जाणून घ्यायचे असल्यास सरकार आमच्याशी चर्चा का करत नाही?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
“सरकार काय भूमिका घेते, हे आमच्यासाठी दुय्यम आहे. आम्ही सर्वांना बरोबर घेऊन एकत्रित लढा उभारणार असून कंपनी बंद करण्यास भाग पाडू,” असे स्पष्ट करत त्यांनी सांगितले की, बाधित ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी सध्या गावागावांत बैठका घेतल्या जात आहेत. आयनी, असगणी, दाभिळ, मेटे, कोतवली, घाणेकुंट, सातवीन गाव, लवेल, सोनगाव आणि मालदोली येथे बैठका पार पडल्या असून ग्रामस्थांनी संघर्ष समितीच्या लढ्याला एकमुखी पाठिंबा दर्शवला आहे. ग्रामस्थांचे संघटन पूर्ण झाल्यानंतर तातडीने परिषद घेऊन महत्त्वाचे ठराव शासनाला पाठवण्यात येतील. त्यानंतर कंपनीला टाळे ठोकण्याच्या मागणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या लढ्यात सर्वांनी निपक्षपातीपणे सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
बैठकांदरम्यान ग्रामस्थ विविध आजारांच्या तक्रारी मांडत असून काहींना कर्करोग, तर काहींना पक्षाघातासारखे गंभीर आजार झाल्याचा दावा करण्यात येत आहे. चार दिवसांपूर्वी सोनगाव येथे चार जनावरे दगावल्याची माहिती मिळाल्याचे सांगून, याची प्रशासकीय यंत्रणा दखल घेत नसल्याचा आरोप दलवाई यांनी केला.
“हा लढा कोकण वाचवण्यासाठी आणि तरुणांच्या भविष्यासाठी आहे. संघर्ष समिती अथवा तिचा कोणताही कार्यकर्ता मॅनेज होणार नाही. आंदोलनादरम्यान पोलिसांनी कारवाई केली, तरी आम्ही सर्वांत पुढे असू; पहिली काठी आम्ही खाऊ, जेलमध्येही आम्ही जाऊ. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये,” असेही दलवाई यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेस समितीचे समन्वयक भरत लब्धे, पर्यावरण अभ्यासक पंकज दळवी, सामाजिक कार्यकर्ते राजन इंदुलकर, तुळशीराम पवार आदी उपस्थित होते.