मुंबई-गोवा महामार्गावर ट्रकची स्कॉर्पिओला धडक
दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान
संगमेश्वर:
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (क्र. ६६) माभळे पुनर्वसन येथे आयशर ट्रक आणि स्कॉर्पिओ यांच्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. महामार्गाचे काम सुरू असताना एका लेनवरून वाहतूक सुरू असताना ट्रक चालकाने विरुद्ध दिशेने येऊन समोरून येणाऱ्या गाडीला धडक दिली. या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.
अंबरनाथ (जि. ठाणे) येथील रहिवासी भिमराव मरीअप्पा चलवादी (वय ४८) हे आपल्या ताब्यातील स्कॉर्पिओ गाडीने (क्र. एम.एच. ०५ एफ.व्ही. २७३६) इंजिनिअरसह बावनदी येथून संगमेश्वरच्या दिशेने येत होते. १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११:१० च्या सुमारास ते माभळे पुनर्वसन येथील कोल्हापूर मोटार गॅरेजसमोर आले होते.
सध्या महामार्गाचे काम सुरू असल्याने या भागात एकाच लेनवरून दोन्ही बाजूची वाहतूक सुरू आहे. यावेळी संगमेश्वरहून रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या आयशर ट्रकने (क्र. एम.एच. ११ ए.एल. ०८३२) रस्त्याची परिस्थिती लक्षात न घेता भरधाव वेगात विरुद्ध दिशेला येऊन समोरून येणाऱ्या स्कॉर्पिओला जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की, स्कॉर्पिओ आणि आयशर ट्रक या दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र वाहनांच्या नुकसानीमुळे मोठे आर्थिक संकट ओढवले आहे.
या प्रकरणी स्कॉर्पिओ चालक भिमराव चलवादी यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी ट्रक चालक मयुर हनुमंत चंदनशिवे (वय ३२, रा. सावर्डे पोलीस लाईन) याच्या विरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम २८१ आणि मोटर वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (गु.र.नं. ०८/२०२६). पुढील तपास पोलीस करत आहेत.