१५ वर्षांनंतर गुहागर पं. स.वर युतीचा झेंडा
भास्कर जाधवांना भाजप-शिवसेनेचा मोठा दणका
गुहागर:
गुहागर तालुक्यात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत भाजप-शिवसेना महायुतीने दणदणीत विजय मिळवत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आमदार भास्कर जाधव यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या गुहागरमध्ये युतीने मुसंडी मारली असून, तब्बल १५ वर्षांनंतर पंचायत समितीवर युतीची सत्ता आली आहे.
पंचायत समितीच्या एकूण १० जागांपैकी ९ जागांवर युतीने विजय मिळवून विरोधकांचा सफाया केला आहे. विशेष म्हणजे, भाजपने आपल्या वाट्याला आलेल्या सर्व ५ जागांवर विजय मिळवत १०० टक्के यश संपादन केले. तर जिल्हा परिषद निवडणुकीत ५ पैकी ३ जागांवर युतीचे उमेदवार विजयी झाले आहेत.
एकेकाळी युतीचा बालेकिल्ला असलेल्या गुहागरमध्ये जागावाटपाच्या वादातून युती तुटल्याचा फायदा आमदार भास्कर जाधव यांनी घेतला होता. गेल्या अनेक वर्षांपासून पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीवर त्यांचे वर्चस्व होते. मात्र, केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यानंतर स्थानिक कार्यकर्त्यांनी कंबर कसली आणि जाधवांचे वर्चस्व मोडीत काढण्यात यश मिळवले.
माजी आमदार डॉ. विनय नातू यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत या विजयाचे मुख्य कारण मानले जात आहे. आमदार भास्कर जाधव यांचा प्रभाव असतानाही डगमगून न जाता कार्यकर्त्यांनी पक्ष संघटना मजबूत केली. नगरपंचायतीत नगराध्यक्ष बसवल्यानंतर आता पंचायत समितीवरही सत्ता मिळवल्याने भाजपने तालुक्यात आपले ‘गतवैभव’ पुन्हा मिळवले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
आगामी काळासाठी विजयाची नांदी
अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिळालेला हा विजय गुहागर भाजपसाठी ‘नवसंजीवनी’ ठरणार आहे. पराभवाचा काळ सोसलेल्या कार्यकर्त्यांना या निकालाने नवे बळ दिले असून, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी ही एक महत्त्वाची विजयाची नांदी असल्याचे बोलले जात आहे.