चौपदरीकरण कामामुळे माभळेतील घरांना तडे
संगमेश्वर
मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर ते माभळे दरम्यान चौपदरीकरणाचे काम सध्या जोरात सुरू असताना माभळे गावातील काही घरांना तडे जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
माभळे येथील चौपदरीकरणाचे काम १७ वर्षे रखडले आहे. रखडलेल्या सोनवी पुलासह या मार्गावरील काम अखेर ठेकेदार कंपनीकडून हाती घेण्यात आले आहे. गणेश हॉटेल ते पुनर्वसन परिसरादरम्यान रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून या कामादरम्यान मोठ्या प्रमाणात डोंगर उत्खनन करण्यात येत आहे. डॉ. हर्षदा डिंगणकर यांच्या घराजवळ मोठ्या प्रमाणात डोंगर खोदाई करण्यात येत असून ही खोदाई हद्दरेषेबाहेर करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
घरांच्या सुरक्षिततेचा अंदाज न घेता उत्खनन सुरू असल्याने त्यांच्या घराला तडे जाऊ लागले आहेत. तसेच उज्वला खापरे व घडशी यांच्या घरांपर्यंत जाण्यासाठी समोरील मार्ग ठेवण्यात आलेला नाही, तसेच त्यांना कोणताही मोबदला मिळालेला नसल्याची त्यानी तक्रार केली आहे. चौपदरीकरणाची सीमारेषा निश्चित असतानाही ती वारंवार बदलली जात असल्याने ग्रामस्थांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कामाच्या पद्धतीमुळे जीवित व मालमत्तेचा धोका वाढत असल्याची भीती व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांनी तातडीने संरक्षण भिंत उभारावी, सुरक्षित उत्खनन करावे, बाधितांना मोबदला द्यावा आणि सीमारेषा स्पष्ट करावी, अशी मागणी ठेकेदार कंपनी व संबंधित प्रशासनाकडे केली आहे..