स्क्रॅप व्यावसायिकांना बेदम मारहाण
रत्नागिरीच्या जंगलात प्रकार; जखमी कोल्हापूरचे
रत्नागिरी: स्क्रॅप खरेदीच्या व्यवहारासाठी बोलावून कोल्हापूरच्या दोघा स्क्रॅप व्यावसायिकांना बेदम मारहाणीचा प्रकार रत्नागिरीतील नर्मदा जंगल परिसरात घडला. समीर सनाउल्ला उस्ताद (वय ४०, रा. विक्रमनगर) व अख्तर हसन इमानदार (४७, रा. गोखले कॉलेज चौक) अशी जखमींची नावे आहेत.
अधिक माहिती अशी, समीर उस्ताद यांचे रत्नागिरीतील अजमेर नावाच्या व्यक्तीशी स्क्रॅपचा व्यवहार ठरला होता. खरेदीला जाण्यासाठी ४० हजारांची रक्कम त्यांनी सोबत घेतली होती. मित्र अख्तर याची मोटार घेऊन दोघे शुक्रवारी रत्नागिरीत पोहोचले. तेथे त्यांचे अजमेर याच्याशी बोलणे सुरू असताना किरकोळ वाद झाला. अजमेरने साथीदारांना बोलावून समीर व अख्तरला येथील निर्जन जंगलात नेले.
काठ्या, लोखंडी गजाने दोघांना बेदम मारहाण केली. पाठीवर, दंडावर, पायांवर झालेल्या मारहाणीत दोघेही गंभीर जखमी झाले. मारहाणीतून स्वतःची सुटका करून घेत दोघेही सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. त्यांनी दिलेल्या माहिती आधारे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.