खवटी येथे ‘हिट ॲंड रन’चा प्रकार
तरुणी जागीच ठार; चालकावर गुन्हा दाखल
खेड:
मुंबई-गोवा महामार्गावरील खवटी तुळशी फाटा येथे शुक्रवारी १३ फेब्रुवारी पहाटेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडणाऱ्या २५ ते ३० वर्षीय तरुणीला भीषण धडक दिली. या अपघातात तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून, धडक देणारे वाहन चालक अपघाताची माहिती न देता घटनास्थळावरून पसार झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १३ फेब्रुवारी रोजी पहाटे ४:३५ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मुंबई दिशेकडून गोवा दिशेकडे जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने या अनोळखी तरुणीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, वाहनाचे चाक तरुणीच्या डोक्यावरून आणि उजव्या पायावरून गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर संबंधित चालकाने जखमीला कोणतीही मदत न करता किंवा पोलिसांना माहिती न देता तिथून पळ काढला.
खेड पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस शिपाई पुनम दिलीप माने यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०६ (१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४, १३४ (ब), १७७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
खेड पोलीस परिसरातील सीसीटीव्ही आणि प्रत्यक्षदर्शींच्या आधारे तपास करत आहेत. कोणाला या तरुणीबाबत माहिती असल्यास खेड पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.