जयगड येथील मच्छिमाराचा मृत्यू
पायाच्या जखमेने घेतला बळी
रत्नागिरी (प्रतिनिधी):
जयगड येथील एका ३९ वर्षीय मच्छिमाराचा दीर्घ आजाराने आणि पायाच्या जखमेवर उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. मोहम्मद हनिफ युसुफ गडबडे (रा. अकबर मोहल्ला, जयगड, ता. जि. रत्नागिरी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची मृत्यूशी झुंज सुरू होती, मात्र रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
मयत मोहम्मद हनिफ गडबडे हे व्यवसायाने मच्छिमार होते. त्यांना गेल्या एक वर्षापासून मधुमेह हा आजार होता. या आजारामुळे त्यांच्या उजव्या पायाच्या घोट्याला जखम झाली होती. ही जखम बरी होत नसल्याने त्यांच्यावर चिरायु हॉस्पिटल आणि रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटलमध्ये वारंवार उपचार करण्यात आले होते.
प्रकृती सुधारत नसल्याने त्यांना विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
सुरुवातीला उर्जा हॉस्पिटल, जयगड येथे दाखल केल्यावर प्रकृती गंभीर असल्याने रुग्णवाहिकेने रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी कोल्हापूर येथील डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र, तेथील उपचारांचा खर्च जास्त असल्याने कुटुंबीयांनी त्यांना पुन्हा रत्नागिरी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला.
पुन्हा रत्नागिरीत दाखल केल्यानंतर उपचार सुरू असतानाच, मंगळवार, १० फेब्रुवारी रोजी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून ‘मयत’ घोषित केले. या घटनेची माहिती त्यांचा मुलगा आणि खबरी एजाज मोहम्मद हनिफ गडबडे यांनी पोलीस ठाण्यात दिली.
रत्नागिरी पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यू (आ.मृ.) क्रमांक ०६/२०२६ नुसार बी.एन.एस.एस. कलम १९४ प्रमाणे नोंद केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.