भटक्या कुत्र्यांच्या झुंडीचा विद्यार्थिनीवर हल्ला
चिपळूणच्या पेठमाप परिसरात थरार, नागरिक संतप्त
चिपळूण:
शहरातील पेठमाप तांबटआळी परिसरात गुरुवारी पहाटे एका शाळकरी विद्यार्थिनीवर भटक्या कुत्र्यांच्या कळपाने भीषण हल्ला केला. कुत्र्यांच्या तावडीतून वाचण्याच्या प्रयत्नात ही मुलगी जवळच असलेल्या गटारात कोसळली आणि जखमी झाली. सुदैवाने, स्थानिक नागरिकांनी वेळीच धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे ही अल्पवयीन विद्यार्थिनी नेहमीप्रमाणे शाळेसाठी घराबाहेर पडली होती. तांबटआळी परिसरातून जात असताना अचानक १० ते १२ भटक्या कुत्र्यांच्या झुंडीने तिला घेराव घातला. कुत्रे अंगावर धावून आल्याने मुलगी प्रचंड घाबरली. स्वतःचा बचाव करण्यासाठी ती पळू लागली असता तिचा पाय घसरला आणि ती बाजूला असलेल्या उघड्या गटारात कोसळली.
नागरिकांच्या सतर्कतेने टळला अनर्थ
मुलीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घराबाहेर धावून आले. नागरिकांनी आरडाओरड करत आणि दगड मारून कुत्र्यांना पळवून लावले. यामुळे कुत्र्यांनी मुलीचा पाठलाग सोडला. नागरिकांनी तातडीने तिला गटारातून बाहेर काढले. या घटनेत विद्यार्थिनीला किरकोळ दुखापत झाली असून ती प्रचंड मानसिक धक्क्याखाली आहे.
चिपळूण शहरात गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. पेठमाप, तांबटआळी, आणि संसारे नाका परिसरात कुत्र्यांच्या झुंडींमुळे नागरिक, विशेषतः लहान मुले आणि वृद्ध भयभीत झाले आहेत. प्रशासनाकडून कारवाईची मागणी
या घटनेनंतर चिपळूण नगर परिषद प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी नसबंदी आणि इतर उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पेठमापमधील नागरिकांनी दिला आहे.