परशुराम घाटात भरधाव ट्रेलर २० फूट खोल खड्ड्यात कोसळला
चालकावर गुन्हा दाखल
चिपळूण:
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत धोकादायक मानल्या जाणाऱ्या परशुराम घाटात एका भरधाव ट्रेलरचा भीषण अपघात झाला. उताराच्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रेलर थेट २० फूट खोल खड्ड्यात जाऊन पलटी झाला. या अपघातात चालक जखमी झाला असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदाबाद येथील ट्रान्सपोर्ट व्यावसायिक सुशिल कुमार नंदराम शर्मा (वय ३५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा ट्रेलर (गाडी क्र. जी.जे. २७/एक्स-८८६८) मुंबईहून गोव्याच्या दिशेने जात होता. दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास, ट्रेलर मौजे पेढे येथील परशुराम घाट उतरत होता.
परशुराम घाटातील सवतसडा वळणाजवळ रस्ता उताराचा आणि वळणाचा असतानाही, चालक श्रवनराम हुकमाराम बिश्नोई याने गाडी वेगाने चालवली. वेगावर नियंत्रण न राहिल्याने ट्रेलरने आधी रस्त्यावरील ‘वेलकम बोर्ड’च्या पोलला जोरदार धडक दिली आणि त्यानंतर रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या २० फूट खोल खड्ड्यात जाऊन पलटी झाला.
या अपघातात चालक श्रवनराम बिश्नोई (रा. पाली, राजस्थान) हा स्वतः जखमी झाला आहे. घाटातील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, हयगयीने आणि बेदरकारपणे वाहन चालवून स्वतःच्या व इतरांच्या जिवास धोका निर्माण केल्याप्रकरणी चिपळूण पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा नोंदवला आहे.
चिपळूण पोलिसांनी दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी १.५८ वाजता या प्रकरणाची नोंद केली. पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम २८१, १२५(अ), १२५(ब), ३२४(५) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गु.र.नं. ४४/२०२६ नुसार गुन्हा दाखल केला आहे.