सैतवडे येथे बिबट्याचा वासरावर हल्ला; गावात भीतीचे वातावरण
रत्नागिरी : — सैतवडे गावात गुरुवारी सकाळी बिबट्याने एका वासरावर हल्ला केल्याची घटना उघडकीस आली. ही घटना गावातील डॉ. मयुरेश मोहिते यांच्या घरापासून सुमारे १०० मीटर अंतरावर घडल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांमध्ये चिंतेची भावना आहे. या घटनेची माहिती डॉ. मोहिते यांनी तात्काळ वनविभागाला दिली आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पुढील आवश्यक कार्यवाही सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे.
गाव परिसरात बिबट्याचा वावर असल्याची शक्यता लक्षात घेता ग्रामस्थांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः रात्री व पहाटेच्या वेळी एकट्याने बाहेर जाणे टाळावे, लहान मुलांवर लक्ष ठेवावे तसेच गुरे-वासरे संध्याकाळनंतर सुरक्षित गोठ्यात बांधून ठेवावीत, असेही सांगण्यात आले आहे.
ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने वनविभागाने आवश्यक ती उपाययोजना तातडीने करावी, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.