लांजा–राजापूर तालुक्यात आमदार किरण सामंत यांचे निर्विवाद वर्चस्व
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना महायुतीच्या सर्व उमेदवारांचा दणदणीत विजय
लांजा–राजापूर तालुक्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महायुतीने ऐतिहासिक यश मिळवले आहे. महायुतीच्या सर्व उमेदवारांनी मोठ्या मताधिक्यांनी विजय मिळवत विरोधकांचा पूर्णपणे पराभव केला आहे. या निकालामुळे तालुक्यात आमदार किरण सामंत यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
तालुक्यातील लांजा, राजापूर तसेच दाभोळे परिसरात निकाल जाहीर होताच शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी जल्लोष केला. फटाके फोडून, एकमेकांना पेढे भरवून आणि घोषणाबाजी करत विजयाचा आनंद साजरा करण्यात आला.
या निवडणुकीत स्थानिक विकासकामे, जनतेशी थेट संपर्क आणि विश्वासार्ह नेतृत्व हे विजयाचे प्रमुख कारण ठरले. आमदार किरण सामंत यांनी मतदारांचे आभार मानत, “हा विजय म्हणजे जनतेने विकासाला दिलेली पावती आहे. तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे सांगितले.
या दणदणीत यशामुळे आगामी राजकीय समीकरणांवरही मोठा प्रभाव पडणार असून, लांजा–राजापूर तालुक्यात शिवसेना महायुतीची पकड अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
👉🏻राजापूर जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीतील विजयात अपूर्वा सामंत यांचे भरीव योगदान
राजापूर तालुक्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना महायुतीला मिळालेल्या दणदणीत यशामागे अपूर्वा सामंत यांचे मोलाचे व निर्णायक योगदान ठरले आहे प्रचारापासून ते निकालापर्यंत त्यांनी केलेले सूक्ष्म नियोजन, कार्यकर्त्यांशी सातत्याने साधलेला संवाद आणि मतदारांशी थेट संपर्क यामुळे महायुतीला मोठे मताधिक्य मिळाले.
प्रत्येक मतदारसंघात त्यांनी केलेल्या बैठका, घराघरात पोहोचलेला प्रचार तसेच महिला, युवक आणि सामाजिक घटकांना एकत्र आणण्याची भूमिका ही विजयाची प्रमुख सूत्रे ठरली. अपूर्वा सामंत यांनी स्थानिक प्रश्न, विकासाची दिशा आणि विश्वासार्ह नेतृत्व यावर भर देत मतदारांचा विश्वास संपादन केला.
या विजयामुळे राजापूर तालुक्यात शिवसेना महायुतीची ताकद अधिक मजबूत झाली असून, या यशात अपूर्वा सामंत यांचा सक्रिय सहभाग आणि प्रभावी नेतृत्व निर्णायक ठरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. कार्यकर्त्यांमध्येही त्यांच्या कार्यशैलीबद्दल मोठा उत्साह आणि सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे.