संपर्कक्रांती एक्सप्रेसची धडक लागून वृद्धाचा मृत्यू
कळबंस्ते रेल्वे ट्रॅकवरील घटना
चिपळूण:
चिपळूण तालुक्यातील कळबंस्ते पवारवाडी येथे रेल्वे ट्रॅकवरून चालत जात असताना संपर्कक्रांती एक्सप्रेसची धडक लागून एका ९० वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू झाला. नारायण विठोबा जाधव (रा. दळवटणे भुवडवाडी, ता. चिपळूण) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नारायण जाधव हे नाभिक व्यवसायाचे काम करतात. गुरुवारी, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११:३० च्या सुमारास ते आपल्या कामासाठी रेल्वे ट्रॅकवरून चालत जात होते. याच वेळी कळबंस्ते पवारवाडी दरम्यान डाऊन मार्गावरून जाणाऱ्या संपर्कक्रांती एक्सप्रेस (गाडी क्र. १२२१८) ची त्यांना जोराची धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, त्यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मृताचा मुलगा शंकर नारायण जाधव यांनी दिली. घटनेची वर्दी मिळताच रेल्वे आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात बी.एन.एस.एस १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.