रत्नागिरी जिल्ह्यात जुगार अड्ड्यांवर पोलिसांचे छापे; दोन जण ताब्यात
रत्नागिरी: जिल्हा पोलीस दलाने अवैध जुगार धंद्यांविरुद्ध मोहीम तीव्र केली असून, संगमेश्वर आणि राजापूर तालुक्यात दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये ‘मटका’ जुगार खेळवणाऱ्या दोन व्यक्तींना अटक केली आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
संगमेश्वर तालुक्यातील कोडगाव येथे गिरजाई देवी मंदिराच्या कोपऱ्यात आडोशाला बसून मटका खेळवणाऱ्या रुपेश सुरेश माने (वय ३८, रा. भडकंबा) याला देवरुख पोलिसांनी रंगेहाथ पकडले. ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५:०५ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. मपोहेकों मनस्वी मंदार पावसकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी लोकांकडून पैसे स्वीकारून ‘कल्याण मटका’ खेळवत होता. देवरुख पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) नुसार गुन्हा (गु.र.नं. १९/२०२६) दाखल करण्यात आला आहे.
दुसरी कारवाई राजापूर तालुक्यातील पाचल बाजारपेठेत करण्यात आली. महालक्ष्मी फूटवेअरच्या मागील मोकळ्या जागेत ‘मुंबई मटका’ खेळवणाऱ्या संतोष जनार्दन गांगण (वय ६५, रा. पाचल पेठवाडी) याला पोलिसांनी ताब्यात घेतले. रायपाटण पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल रामकृष्ण ज्ञानदेव कात्रे यांनी ही कारवाई केली. आरोपी बेकायदेशीरपणे मुंबई मटका जुगार खेळवत असताना मिळून आला. राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा (गु.र.नं. २६/२०२६) दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध पोलिसांची ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.