रत्नागिरी हादरली! महाविद्यालयातील शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीवर ५ वर्षे अत्याचार
पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
रत्नागिरी:- रत्नागिरी शहरातील एका नामांकित महाविद्यालयात शिकवणाऱ्या शिक्षकाने एका अल्पवयीन मुलीवर दीर्घकाळ अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शैक्षणिक क्षेत्रात आणि शहरात एकच खळबळ उडाली असून शिक्षकी पेशाला काळिमा फासणाऱ्या या कृत्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनंतर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षकाविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर पीडित मुलगी ज्या महाविद्यालयात शिकत होती, त्याच महाविद्यालयातील शिक्षकाने तिच्यावर अत्याचार केले. हा प्रकार फेब्रुवारी २०२१ पासून सुरू होता तो जानेवारी २०२६ पर्यंत सातत्याने सुरू राहिला. या पाच वर्षांच्या कालावधीत नराधम शिक्षकाने वेगवेगळ्या वेळी आणि वेगवेगळ्या ठिकाणी या मुलीला गाठून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. अखेर पीडितेने धाडस करून पोलिसांत धाव घेत या आपबितीची तक्रार दिली आहे.
पोलीस तपास आणि गुन्हा नोंद
पीडित मुलीच्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६४ (१), ६४(२) (f), ६४(२) (m), ६९, ३५१ आणि लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पॉक्सो) कायदा कलम ४, ६, ८ व १० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियांका देसाई करत आहेत. नराधम शिक्षकाला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी आता जनसामान्यांतून केली जात आहे.