अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचारी जागीच ठार
खेड नजीकचा प्रकार; धडक देऊन चालक फरार
खेड (प्रतिनिधी):
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पारस आईस फॅक्टरीसमोर शनिवारी पहाटे एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात अवजड वाहनाने पादचाऱ्याला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला असून, अपघातग्रस्त वाहन चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे.
मनिष (राजू) मोहन धाडवे (वय ४०, रा. परशुराम दुर्गेवाडी, ता. चिपळूण) असे या अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मनिष धाडवे हे ३१ जानेवारी रोजी पहाटे ३.५० च्या सुमारास महामार्गावरून पायी जात होते. यावेळी मागून येणाऱ्या एका अज्ञात अवजड वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, वाहनाचे चाक मनिष यांच्या डोक्यावरून गेल्याने कवटी फुटून चेहरा पूर्णपणे चिरडला गेला. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघात घडल्यानंतर जखमीला कोणतीही वैद्यकीय मदत न पुरवता किंवा पोलिसांना माहिती न देता, अज्ञात वाहन चालक आपल्या वाहनासह चिपळूणच्या दिशेने वेगाने पळून गेला. या प्रकरणी संदीप गंगाराम साळवी (वय ५०, रा. पिरलोटे बेलवाडी) यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
खेड पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४, १३४(अ)(ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलीस फरार चालकाचा शोध घेत आहेत.