रत्नागिरीच्या डॉ. आरती मुंडे-गुर्जर यांचा जागतिक दर्जाचा शोध
प्लास्टिकला ‘कसावा’ कंदाचा पर्यावरणपूरक पर्याय
रत्नागिरी :
प्लास्टिक प्रदूषणाची वाढती समस्या लक्षात घेता पर्यावरणपूरक पर्यायांची गरज दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील पॅकेजिंग तज्ज्ञ डॉ. आरती मुंडे-गुर्जर यांनी ‘कसावा’ (तापीओका) या कंदाच्या स्टार्चपासून जैवविघटनशील प्लास्टिक फिल्म विकसित करून महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे.
ही फिल्म पारंपरिक प्लास्टिकला प्रभावी आणि सुरक्षित पर्याय ठरत आहे.या फिल्मचा वापर बिस्किटे, बटाटा चिप्स, केचअप, जेली आदी खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगसाठी करून पाहण्यात आला. हे पदार्थ सहा महिन्यांपर्यंत खोलीच्या तापमानावर साठवून ठेवले असता त्यांची चव, गुणवत्ता आणि सुरक्षितता कायम राहिल्याचे आढळून आले.
डॉ. मुंडे-गुर्जर यांच्या मते, वाढत्या प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. कसावा आधारित ही फिल्म नैसर्गिक घटकांपासून तयार झाल्याने जमिनीत गाडल्यानंतर तिचे सहज विघटन होते आणि प्रदूषण टाळता येते.
अन्नपदार्थांसाठी ती पूर्णतः सुरक्षित असल्याने उद्योगांसाठीही हा एक विश्वासार्ह पर्याय ठरू शकतो.
या तंत्रज्ञानाला पेटंट मिळाले असून, व्यावसायिक स्तरावर वापरासाठी पुढील प्रक्रिया सुरू आहे. पर्यावरण रक्षणासोबतच सुरक्षित अन्नपॅकेजिंगचा मार्ग मोकळा करणारा हा शोध पॅकेजिंग उद्योगासाठी आशादायक मानला जात आहे.