चिपळुणात मटका जुगारावर पोलिसांचा छापा
शिरगाव बाजारपेठेतून एकाला अटक
चिपळूण:
चिपळूण तालुक्यातील शिरगाव बाजारपेठ परिसरात छुप्या पद्धतीने चालणाऱ्या मटका जुगारावर अलोरे-शिरगाव पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत एका वृद्ध व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
दिनांक २९ जानेवारी रोजी दुपारी शिरगाव बाजारपेठ येथील देवळेकर आणि अडविलकर यांच्या घरांच्या दरम्यान असलेल्या बोळात, पाठीमागच्या बाजूला एक व्यक्ती संशयास्पदरीत्या लोकांकडून पैसे स्वीकारत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई अरविंद दादासो जमदाडे यांनी पथकासह त्या ठिकाणी छापा टाकला असता, आरोपी जुगार चालवताना रंगेहात मिळून आला.
याप्रकरणी पोलिसांनी रमेश यशवंत खराडे (वय ६५ वर्षे, रा. पोफळी मानकरवाडी, ता. चिपळूण) याला अटक केली आहे. आरोपी स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे स्वीकारून ‘मुंबई मटका’ नावाचा जुगार खेळवत असल्याचे निष्पन्न झाले.
याप्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम १२ (अ) अन्वये गुन्हा (गु.र.नं. ०३/२०२६) दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणाऱ्या आणि खेळवणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उगारला असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.