जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांचे वडील दिवंगत अच्युत आठल्ये यांचे मरणोत्तर देहदान
रत्नागिरी, :- गुरुराज हाउसिंग सोसायटी, उद्यमनगर येथे राहणाऱ्या दिवंगत अच्युत शिवराम आठल्ये (वय ८९ वर्षे), यांचे २७ जानेवारी रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. कै. आठल्ये यांच्या तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या इच्छेनुसार त्यांचे मरणोत्तर देहदान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे २८ जानेवारी रोजी करण्यात आले. कै. अच्युत आठल्ये हे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांचे वडील होत. त्यांची सून डॉ. रश्मी आठल्ये या शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. हे या महाविद्यालयातील १७ वे मरणोत्तर देहदान आहे.
कै. अच्युत आठल्ये यांचा जन्म १३ जुलै १९३७ रोजी झाला असून त्यांचे मूळ गाव लांजा तालुक्यातील शिपोशी हे आहे. त्यांनी एल.आय.सी. मध्ये सलग ४० वर्षे प्रामाणिक सेवा बजावली. वाचनाची त्यांना अत्यंत आवड होती. सामाजिक जाणिवेतून त्यांनी विविध वाचनालयांना अनेक पुस्तके भेट दिली होती. समाजकार्याची आवड, साधे जीवन आणि विचारशील व्यक्तिमत्त्व ही त्यांची ओळख होती. कै. अच्युत आठल्ये यांच्या या देहदानातून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोलाची मदत होणार असून, त्यांचा हा निर्णय समाजासाठी प्रेरणादायी आहे.
मरणोत्तर देहदान प्रसंगी कै. अच्युत आठल्ये यांची मुलगी, जावई, नातेवाईकांसह जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कुमरे, तसेच जिल्हा परिषद रत्नागिरी येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
ही संपूर्ण देहदान प्रक्रिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. सादिकअली सय्यद, डॉ. योगिता कांबळे, समाजसेवा अधिक्षक रेशम जाधव तसेच शरीररचनाशास्त्र विभागातील पूर्वा तोडणकर, भूमी पारकर, राज पेडणेकर व श्रेयस जोशी यांनी देहदान प्रक्रियेत सहकार्य केले.