जिल्ह्यात बँक कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी
नऊ संघटनांचा सहभाग; पाच दिवसाचा आठवड्याची मागणी
रत्नागिरी : पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी पुकारण्यात आलेला बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप रत्नागिरी जिल्ह्यात १०० टक्के यशस्वी झाला.
‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन’च्या नेतृत्वाखाली बँकिंग क्षेत्रातील सर्व नऊ संघटना या संपात सहभागी झाल्याने जिल्ह्यातील बँकिंग सेवा विस्कळीत झाली. सरकारने आमच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यानेच आम्हाला रस्त्यावर उतरावे लागले, असा पवित्रा कर्मचारी संघटनांनी घेत एक दिवसाचा संप केला.
बँक कर्मचारी आणि ‘इंडियन बँक्स असोसिएशन’ (IBA) यांच्यात दर पाच वर्षांनी द्विपक्षीय करार होतो. ११ व्या द्विपक्षीय करारामध्ये कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा असावा, हे आयबीएने तत्वतः मान्य केले होते. त्यानंतर १२ व्या कराराच्या वाटाघाटीत यावर एकमत होऊन तसा प्रस्ताव केंद्रीय वित्त मंत्रालयाकडे पाठवण्यात आला. वित्त मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव आता ‘पीएमओ’ कार्यालयाकडे अंमलबजावणीसाठी प्रलंबित आहे. गेली दोन वर्षे यावर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. रत्नागिरी जिल्ह्यात या संपाला कर्मचाऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळाला. सर्व नऊ संघटनांचे सभासद या संपात सहभागी झाले होते. जिल्ह्यातील बहुतांश बँकांच्या शाखांचे कामकाज पूर्णपणे बंद होते, ज्याचा परिणाम आर्थिक व्यवहारांवर झाला. संपाचे यशस्वी नेतृत्व विनोद कदम, भाग्येश खरे, किरण खोपडे, मनोज लिंगायत, विजय होलंब आणि दीपक वैद्य यांनी केले.