सैतवडे येथे ‘दि मॉडेल इंग्लिश स्कूल’ला 2 स्मार्ट टीव्ही भेट
रत्नागिरी:
येथील दि मॉडेल इंग्लिश स्कूल मध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या मंगल दिनाचे औचित्य साधून शाळेला आधुनिक शिक्षणासाठी दोन ५५ इंची स्मार्ट टेलिव्हिजन संच भेट देण्यात आले असून, यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षणाची दारे खुली झाली आहेत.
मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण व गौरव
कार्यक्रमाची सुरुवात श्री. स्वप्नील पालांडे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाली. यावेळी विद्यार्थ्यांनी दिमाखदार प्रभातफेरी आणि कवायत संचलन सादर केले. त्यानंतर शाळेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला.
मुंबई येथील कै. यतीन प्रेमजी वसंतजी देढीया यांच्या स्मरणार्थ हे स्मार्ट टीव्ही संच शाळेला प्रदान करण्यात आले. यासाठी हिरेनभाई प्रवीणभाई शाह (मुंबई), स्वप्नील पालांडे (मुंबई) आणि उमेश रहाटे (वाटद) यांचे विशेष सहकार्य लाभले. या दातृत्वाबद्दल स्वप्नील पालांडे आणि उद्योजक उमेश रहाटे यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
शाळेची शैक्षणिक प्रगती पाहून श्री. पालांडे यांनी समाधान व्यक्त केले, तर श्री. अंतुले सर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांनी सर्व पाहुण्यांचे स्वागत केले.
या सोहळ्याला मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष अजीज माद्रे, गनी खतीब, हशमत निवेकर, सरपंच सौ. उषा सावंत, उपसरपंच मुनाफ वागळे, तंटामुक्ती अध्यक्ष दिलावर खान, मुख्याध्यापक इम्रान अंतूले, पत्रकार संकेत ढवळे यांसह अनेक मान्यवर, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद पेढे, रुमान पारेख व श्रीमती ऋतुजा जाधव यांनी केले.