खालगाव-जाकादेवी येथे मटका-जुगारावर पोलिसांची कारवाई
रत्नागिरी :
तालुक्यातील खालगाव- जाकादेवी येथील एका टपरीच्या आडोशाला चालणाऱ्या मटका जुगारावर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह ५२० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष दाजी धामणे (वय ५३, रा. खालगाव-जाकादेवी भटवाडी, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २४) सकाळी नऊच्या सुमारास निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित विनापरवाना खालगाव-जाकादेवी येथील बाजारपेठेतील एका टपरीच्या आडोशाला मटका जुगार चालवत असताना निदर्शनास आला. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल बाजीराव कदम यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.