अज्ञात वाहनाची धडकेत पादचार्याचा जागीच मृत्यू
रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा ते निवळी जाणाऱ्या रस्त्यावरील भोके आंबेकरवाडी तिठा येथे अज्ञात वाहनाची धडक बसून पादचारी वृध्दाचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवार 20 जानेवारी रोजी रात्री 8.30 वा.सुमारास घडली. प्रकाश रघुनाथ पांचाळ (70,रा.मु.नांदिवली पो.शिरबंवली,लांजा) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृध्दाचे नाव आहे. याबाबत ओमकित सखाराम तारवे (33,रा.हातखंबा तारवेवाडी,रत्नागिरी) याने ग्रामीण पोलिस ठाण्यात खबर दिली आहे. त्यानुसार, मंगळवार 20 जानेवारी रोजी रात्री यातील वृध्द फिरस्ता पादचारी प्रकाश पांचाळ हा भोके आंबेकरवाडी तिठा समोर रस्त्याचे दुभाजकच्या पलीकडून निवळी ते हातखंबा जात होता. त्यावेळी कोणत्यातरी अज्ञात वाहनाने त्याला धडक दिल्याने तो गंभिर जखमी होउन रस्त्यावर पडला. त्याला तातडीने रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू रात्री 9.21 वा.सुमारास तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी प्रकाश पांचाळ यांना तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.