कळंबट येथे बिबट्याचा पाळीव कुत्र्यावर हल्ला
भीतीचे वातावरण; वनविभागाकडून दक्षतेच्या सूचना
दापोली : दापोली तालुक्यातील कळंबट येथे बिबट्याच्या वावराने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी रात्री घराच्या पडवीत बांधलेल्या पाळीव कुत्र्यावर बिबट्याने अचानक हल्ला करून तो अलगदपणे उचलून नेल्याची घटना घडली.
कळंबट परिसरात मागील काही वावर दिवसांपासून बिबट्याचा वाढल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. या घटनेदरम्यान बिबट्याने डरकाळी फोडत घराजवळच असलेल्या कुत्र्यावर झडप घातल्याचे व्हिडिओमध्ये कैद झाले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. त्यामुळे नागरिकांची चिंता अधिक वाढली आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वेळेस विविध कार्यक्रम, कामानिमित्त ग्रामस्थांची ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत बिबट्याच्या मुक्त वावरामुळे लहान मुले, महिला आणि वयोवृद्ध नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली असून, बिबट्याला तत्काळ पकडून सुरक्षित ठिकाणी हलवावे, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. वनविभागानेही नागरिकांनी सतर्क -राहण्याचे आवाहन केले आहे.