चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले यांची पदोन्नतीने साताऱ्यात बदली
चिपळूण:
गेल्या दोन वर्षांपासून चिपळूण नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असलेले विशाल श्रीरंग भोसले यांची पदोन्नतीने बदली झाली असून ते आता सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारणार आहेत. त्यांच्या जागी संजय जाधव हे चिपळूण नगर परिषदेचे नवे मुख्याधिकारी म्हणून लवकरच रुजू होणार आहेत. ही बदली १९ जानेवारी रोजी शासनाचे अवर सचिव अशोक लक्कस यांनी जारी केलेल्या आदेशानुसार करण्यात आली आहे.
मुख्याधिकारी भोसले यांच्या कार्यकाळात चिपळूण शहराच्या विकासाला नवी दिशा मिळाली. शहरातील आरोग्य व्यवस्था, पाणीपुरवठा आणि स्वच्छतेवर त्यांनी विशेष भर दिला. त्यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली चिपळूण नगर परिषदेला ‘माझी वसुंधरा’ अभियानात कोकण विभागात प्रथम क्रमांक, तर राज्यात १४वा क्रमांक मिळाला.
नव्या पिढीमध्ये वाचनसंस्कृती रुजावी, यासाठी दर रविवारी ‘वाचू आनंदाने’ हा अभिनव उपक्रम त्यांनी सुरू केला. तसेच इंधन बचत व पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी दर महिन्याच्या १ तारखेला ‘सायकल डे’ उपक्रम राबवण्यात आला. या अंतर्गत अधिकारी व कर्मचारी सायकलने किंवा पायी कार्यालयात येत होते. स्वतः मुख्याधिकारी भोसले नियमितपणे सायकलने नगर परिषदेत येत असल्याने या उपक्रमाला मोठी प्रेरणा मिळाली.
चिपळूण शहर प्लास्टिकमुक्त करण्याच्या उद्देशाने महिलांसाठी ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. अशा विविध लोकाभिमुख व पर्यावरणपूरक उपक्रमांमुळे चिपळूण शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली असून, त्यांच्या कार्यकाळाची शहरवासीयांकडून सकारात्मक दखल घेतली जात आहे.