पादचारी महिलेच्या मृत्यूस कारणीभूत झालेल्या चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः बामणोली (ता. संगमेश्वर) येथे वाळू मिक्स करणाऱ्या मिक्सर गाडीने पादचारी महिलेला ठोकर दिली. या अपघातामध्ये ती गंभीर जखमी झाली. उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी देवरुख पोलिस ठाण्यात संशयित मिक्सर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. मोनु आत्मज मांगी (वय २३ रा. बरखीया ता. ललितपुर, राज्य उत्तरप्रदेश) असे संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. १७) सायंकाळी पाचच्या सुमारास मारळ ते बामणोली जाणाऱ्या ६०० मिटर अंतरावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पादचारी महिला या काजूच्या बागेत साफसफाई करुन मारळ ते बामणोली जाणाऱ्या रस्त्याने चालत येत असताना बामणोली कातळ स्टॉपचे अलिकडे ६०० मिटर अंतरावर मोरीचे बांधकाम सुर असलेल्या ठिकाणी खडी व वाळू मिक्स करणारा एक्सेज मिक्सर गाडी (क्र. एमएच-०९ जी. झेड २०१४) वरिल संशयित चालक मोनू मांगी याने वाहन निष्काळजीपणे चालवून पादचारी महिलेला ठोकर दिली. या अपघातात मिक्सरचे चाक तिच्या डाव्या पायावरुन गेल्याने ती खाली पडली. तिच्या डाव्या कानाच्या वरिल बाजूस डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारासाठी देवरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. या प्रकरण दिपक गणपत गराटे (वय ४४, रा. बामणोली-मधलीवाडी, ता. संगमेश्वर) यांनी देवरुख पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित मिक्सर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.