रत्नागिरीत श्री श्री रविशंकरजींच्या उपस्थितीत होणाऱ्या ‘भक्ती उत्सवा’ची जय्यत तयारी; गुरुपूजनाने कामाचा शुभारंभ
रत्नागिरी:
विश्वशांतीचे अग्रदूत आणि ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक पूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या दिव्य उपस्थितीत रत्नागिरीमध्ये आगामी २२ जानेवारी रोजी भव्य ‘भक्ती उत्सव’ रंगणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी स्थानिक गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या मैदानाची निवड करण्यात आली असून, या कार्यक्रमाच्या तयारीला आता खऱ्या अर्थाने वेग आला आहे. गुरुवारी या नियोजित स्थळी अत्यंत मंगलमय वातावरणात गुरुपूजन करण्यात आले आणि त्यासोबतच उत्सवाच्या प्रत्यक्ष कामाचा श्रीगणेशा झाला.
हा भक्ती उत्सव केवळ एक कार्यक्रम नसून आध्यात्मिक आणि सांस्कृतिक समृद्धीचा एक अनोखा संगम असणार आहे. रत्नागिरीकरांसाठी ही एक मोठी पर्वणी असून, गुरुदेवांच्या सान्निध्यात होणाऱ्या या सोहळ्यामुळे शहरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. २२ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ठीक ६ वाजता हा सोहळा सुरू होईल. या मोठ्या आयोजनासाठी लागणारी आसनव्यवस्था, भव्य रंगमंच आणि इतर तांत्रिक कामांची सुरुवात करण्यापूर्वी परंपरेनुसार गुरुपूजन करून आशीर्वाद घेण्यात आले.
या प्रसंगी आर्ट ऑफ लिव्हिंग रत्नागिरी टीमच्या वतीने भक्ती उत्सवाच्या मुख्य संयोजिका आणि ज्येष्ठ मार्गदर्शिका ॲड. जया सामंत उपस्थित होत्या. त्यांच्यासोबत आर्ट ऑफ लिव्हिंगच्या शिक्षिका सोनिया, विनिता गोखले, भुवना महागावकर, नितीशा मोरे, अनघा देशपांडे आणि निलेश मिरजकर यांसह अनेक स्वयंसेवक आणि अनुयायी उपस्थित होते. गुरुपूजनाच्या या विधीमुळे संपूर्ण परिसरात सकारात्मक ऊर्जेचा संचार झाला असून, सर्व शिक्षक आणि स्वयंसेवक या उत्सवाच्या यशस्वीतेसाठी जोमाने कामाला लागले आहेत.