शिवसेनेकडून पहिला उमेदवारी अर्ज दाखल
पावस गटातून अॅड. महेंद्र मांडवकर ; मंत्री उदय सामंत, उपनेते सांबरेंची उपस्थिती
रत्नागिरी : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जाहीर झाल्यानंतर उमेदवारी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी शिवसेनेतर्फे रत्नागिरी तालुक्यातील पावस जिल्हा परिषद गटातून ॲड. महेंद्र मांडवकर यांनी पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेतर्फे दाखल झालेला हा पहिलाच उमेदवारी अर्ज आहे. या वेळी शिवसैनिक व ॲड. मांडवकर यांच्या सहकाऱ्यांनी मोठी गर्दी केली होती.
दुसऱ्या दिवशी रत्नागिरी निवडणूक अधिकारी कार्यालयातून २५ व्यक्तींनी ५२ उमेदवारी अर्ज स्वीकारले आहेत. रत्नागिरी तालुक्यात दोन दिवसात ३९ व्यक्तींनी ८२ उमेदवारी अर्ज रत्नागिरी निवडणूक अधिकारी कार्यालयातून स्वीकारले आहेत. यात शिवसेना, शिवसेना उबाठा, भाजप, अपक्ष यांचा समावेश आहे. आज अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी शिवसेनेच्यावतीने ॲड. महेंद्र मांडवकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
या वेळी राज्याचे उद्योगमंत्री आणि पालकमंत्री उदय सामंत, शिवसेना उपनेते नीलेश सांबरे, तालुकाध्यक्ष बंड्या साळवी यांच्यासह पावस पंचक्रोशीतील शिवसेना-भाजपाचे अनेक पदाधिकारी या वेळी उपस्थित होते. विभागप्रमुख विजय चव्हाण, उपविभागप्रमुख प्रवीण शिंदे, ज्ञानदेव कोकरे, स्वाती शिंदे, सरपंच सामंत, युवासेनेचे नंदू भाटकर, मेर्वी सरपंच शशिकांत म्हादे, उपविभाग संघटक जितेंद्र शिर्सेकर, बंटी महाकाळ, जिजाऊ संघटनेचे रत्नागिरी तालुकाध्यक्ष मंदार नैकर, लांजा तालुकाध्यक्ष योगेश पांचाळ यांच्यासह शिवसेना, भाजप व जिजाऊचे पदाधिकारी उपस्थित हाते.