चक्कर आलेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू
रत्नागिरी ः चक्कर येवून डोक्याला गंभीर दुखापत झालेल्या वृद्ध महिलेला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान तिचा मृत्यू झाला. कमल शांताराम नाचणकर (वय ८६, रा. समर्थकृपा, मिरजोळे, रत्नागिरी) असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. १५) सकाळी साडेअकराच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार वृद्ध महिला बाथरुमला गेली असताना तिला चक्कर आली आणि त्या पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. बेशुद्ध अवस्थेत त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.