कोंडवी अपघात प्रकरणी चालकावर गुन्हा
संगमेश्वर: तालुक्यातील कोंडवी येथील वळणावर मिनीबस उलटून झालेल्या अपघात प्रकरणी संशयितावर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविंद्र नथुराम कांबळे (वय ५५, रा. दाभोळे-बौद्धवाडी, ता. संगमेश्वर) असे संशयित चालकाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १४) दुपारी साडेतीनच्या सुमारास कोंडवी येथील मोठ्या वळणावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित रवींद्र कांबळे हे मिनी बस (क्र.एमएच-०९ एपी ९९९९) घेऊन पाली ते उमरे अशी पाथरट मार्गे रस्त्याने जात असताना कोंडवी येथील वळणावर निष्काळजीपणे गाडी चालवली. त्यामुळे मिनीबस उजव्या बाजूला असलेल्या २० ते २५ फुट खोल दरीत जावून अपघात झाला. या मध्ये गाडीतील प्रवासी व मोवूनेशा चंदरम बडीगेर (वय ३२, रा. कलकेरी, ता. सिंदगी, जि. बिजापूर, राज्य कर्नाटक) यांच्या मृत्यू झाला. या प्रकरणी फिर्यादी शंकर लालू पवार (वय ५१, रा. हिस्त्रचमढट्टी ता. तालीकोटी, जि. बिजापूर) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास ग्रामीण पोलिस अमंलदार करत आहेत.