दारू समजून विषारी औषध प्यायल्याने वृध्दाचा मृत्यू
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील आंबव येथील एका व्यक्तीचा विषारी औषध प्यायल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राजाराम सिताराम घाटे (वय ५५ वर्ष, रा. आंबव कोंडकदमराव घाटेवाडी, ता. संगमेश्वर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजाराम घाटे आणि त्यांचे नातेवाईक वसंत सिताराम घाटे हे शेतातून काम करून घरी परतले होते. त्यानंतर राजाराम हे घराबाहेर असलेल्या बाथरूममध्ये गेले आणि तिथून बाहेर आल्यावर अंगणातील खुर्चीत येऊन बसले. काही वेळातच त्यांना अचानक उलट्या होऊ लागल्या आणि त्यांच्या शरीरातून विषारी औषधाचा वास येऊ लागला. वसंत घाटे यांनी विचारणा केली असता, राजाराम यांनी सांगितले की, त्यांनी चुकून बाथरूममध्ये ठेवलेले गोचीड मारण्याचे औषध ‘दारू’ समजून प्यायले आहे.
त्यांची प्रकृती बिघडल्याचे पाहून त्यांना तातडीने रिक्षामधून ग्रामीण रुग्णालय, देवरुख येथे दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना १०८ रुग्णवाहिकेने सिव्हिल हॉस्पिटल, रत्नागिरी येथे हलवण्यात आले. मात्र, रत्नागिरी येथे उपचार सुरू असताना १३ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री २.४५ च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. १३ जानेवारी २०२६ वा रोजी संध्याकाळी ६.५७ वाजता बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे देवरुख पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास सुरू आहे.