फ्लिपर्संना टॅग लावलेली ऑलिव्ह रिडले कासवगुहागर समुद्रकिनाऱ्यावर घरट्यांसाठी परतले
रत्नागिरी, : राज्याच्या किनारपट्टीवर सुरू असलेल्या सागरी कासव संवर्धन प्रयत्नांचे यश अधोरेखित करणाऱ्या एका महत्त्वपूर्ण घटनेत, एक मादी ऑलिव्ह रिडले सागरी कासव (लेपिडोथेलिस ऑलिव्हेसिया) 8 जानेवारी 2026 रोजी मौजे गुहागर समुद्रकिनाऱ्यावर येथे घरटे करण्यासाठी परत आली. या कासवाच्या फ्लिपर्सना आयएनडी 11109 आणि आयएनडी 11110 हे विशिष्ट ओळख क्रमांक असलेले धातूचे टॅग लावलेले दिसले, ज्यामुळे हे कासव पूर्वी नोंदणी केलेलेच आहे याची पुष्टी झाली.
2025 मध्ये कोकण किनारपट्टीवर भारतीय वन्यजीव संस्था (डब्लूआयआय) आणि कांदळवन कक्ष यांच्या संयुक्त उपक्रमाचा भाग म्हणून ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांच्या फ्लिपर्सना टॅग लावण्याची मोहीम राबवण्यात आली होती. जानेवारी 2025 ते फेब्रुवारी 2025 दरम्यान, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये एकूण 62 मादी ऑलिव्ह रिडले कासवांना टॅग लावण्यात आले होते, त्यापैकी 59 कासवांना केवळ मौजे गुहागर समुद्रकिनाऱ्यावरच टॅग लावण्यात आले होते. नोंदीनुसार, याच कासवाला 31 जानेवारी 2025 रोजी त्याच घरटे करण्याच्या ठिकाणी टॅग लावण्यात आले होते, जे घरटे करण्याच्या ठिकाणाबददलची त्याची निष्ठा दर्शवते. या घरटे करण्याच्या घटनेची नोंद शासनाच्या कांदळवन कक्षाद्वारे वन विभागाच्या राबवल्या जाणाऱ्या सागरी कासव संवर्धन कार्यक्रमांतर्गत नियुक्त केलेले कासव मित्र शार्दूल तोडणकर व कांदळवन कक्षातील अधिकारी / कर्मचारी यांनी केली.
विशेष म्हणजे, टॅग लावलेली तीन मादी ऑलिव्ह रिडले कासवे त्याच प्रजनन हंगामात (२०२४-२५) पुन्हा गुहागर समुद्रकिनाऱ्यावर घरटे करण्यासाठी परत आली. अशा प्रकारे पुन्हा त्याच समुद्र किना-यावर घरटे करणे आणि पुन्हा सापडण्याच्या नोंदी वैज्ञानिकदृष्ट्या महत्वाच्या आहेत. कारण त्या संशोधकांना लोकसंख्येचा आकार, स्थलांतराचे अध्यांतर घरटे करण्याची वारंवारता आणि अधिवासाप्रती निष्ठा यांचा अंदाज लावण्यास मदत करतात. हे सर्व दीर्घकालीन संरक्षण व संवर्धन नियोजनासाठी महत्त्वपूर्ण घटक आहेत. कांदळवन विभाग दक्षिण कोकण, यांचे अधिनस्त अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक समुदाय, संशोधक आणि संवर्धन स्वयंसेवकांसोबत मिळून सागरी कासव ऑलिव्ह रिडले कासवाच्या संरक्षण व संवर्धनाचे काम करण्यासाठी आणि महाराष्ट्र किनारपट्टीवर सागरी कासवांचे अस्तित्व सुनिश्चित करण्यासाठी काम करीत आहेत. अशाप्रकारे समुद्री कासव किंवा त्यांच्या खुणा आढळल्यास त्वरीत कांदळवन विभागास कळविण्यात यावे असे आवाहन कांदळवन विभागाच्या दक्षिण कोकण विभागीय वन अधिकारी कांचन पवार यांनी केले आहे.