देवरुखात कुत्र्यांचा दोन तरुणांना चावा
देवरुख : शहरातील माणिक चौक परिसरात भटक्या श्वानांनी दोन तरुणांना चावा घेऊन जखमी केले. अक्षय चव्हाण व योगेश पडवळ अशी या तरुणांची नावे असून त्यांनी देवरुख ग्रामीण रूग्णालयात तात्काळ उपचार घेतले. नगरपंचायतीने श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
देवरुख हे तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण आहे. शाळा, महाविद्यालये, सर्व शासकीय कार्यालये, बँक याच ठिकाणी आहेत. देवरुख नगरीत भटक्या श्वानांनी उच्छाद मांडला आहे. शालेय विद्यार्थी, नागरिकांच्या अंगावर जाणे, दुचाकी, चारचाकी वाहनांचा पाठलाग हे श्वान करतात. मंगळवारी देवरुख बसस्थानक, माणिक चौक येथे श्वानांनी दोन जणांचे लचके तोडले. जखमी अक्षय चव्हाण हा लांजा येथील रहिवासी आहे. तो देवरुख येथून वांझोळे येथे नातेवाईकांकडे जात होता. माणिक चौकात कुत्र्याने अक्षय चव्हाण याच्या पायाला चावा घेतला. योगेश याच्यावर बसस्थानक परिसरात कुत्र्याने हल्ला चढवून जखमी केले. या घटनेमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. न.पं. ने तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.