दापोलीत बस पायावरून गेल्याने विद्यार्थी जखमी
दापोली : शहरातील बसस्थानकात बसचे पुढील चाक पायावरून गेल्याने नवमान नजीर गिलगिले (केळशी, मदनतरी मोहल्ल) हा १८ वर्षीय विद्यार्थी जखमी झाल्याची घटना १३ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत बसचालक किरण मुकुंद मोरे (संभाजीनगर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला.
मंगळवारी सकाळी नवमान गिलगिले हा दापोली बसस्थानकात त्याचे मित्र ताहीब चाऊस व आसिफ यांच्या समवेत बस आत येण्याच्या मार्गावर डाव्या बाजूला उभा होता. यावेळी उन्हवरे वाकवली मार्गे दापोली बस (एमएच २० बीएल २२७३) चालक किरण मुकुंद मोरे स्थानकात घेऊन येत असताना बस डाव्या बाजूला वळवल्याने चाक गिलगिले याच्या उजव्या पायावरून गेले.