‘शून्य विद्युत अपघात’ धोरणाची अंमलबजावणी करा
संचालक राजेंद्र पवार यांचे प्रतिपादन
चिपळूण : महावितरण कर्मचाऱ्यांच्या विद्युत अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. आता सार्वजनिक व घरगुती विद्युत अपघातांचे प्रमाण शून्यवत करणे हे उद्दिष्ट आहे. त्यामुळे अधिकारी व कर्मचार्यांनी ‘शून्य विद्युत अपघात’ या धोरणाची काटेकोर अंमलबजावणी करावी, तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त उपकेंद्रांचे ‘आयएसओ’ मानांकन करावे असे आदेश महावितरणचे संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी दिले.
महावितरण रत्नागिरी मंडलाची (जिल्ह्याची) आढावा बैठक येथे (दि.09 रोजी) पार पडली. यावेळी कोकण परिमंडलाचे मुख्य अभियंता अनिल डोये, रत्नागिरी मंडलाचे अधीक्षक अभियंता सुनीलकुमार माने, कार्यकारी अभियंते नितीन पळसुलेदेसाई, जितेंद्र फुलपागरे, धनंजय भामरे, प्रमोद बाबरेकर, अनुराधा आंधनसरे(स्थापत्य), सहाय्यक महाव्यवस्थापक अजय निकम, औद्योगिक संबंध अधिकारी श्रीकृष्ण वायदंडे उपस्थित होते.
पुढे संचालक राजेंद्र पवार म्हणाले, कर्मचार्यांनी वीज यंत्रणेच्या नियमित देखभाल दुरुस्ती सोबतच वीजसुरक्षेचा जागर ग्राहकांच्या घरोघरी करावा. विद्युत धोके टाळण्यासाठी खबरदारी व उपायांची नागरिकांना माहिती द्यावी. महावितरणच्या ग्राहकांना अधिक चांगली सेवा मिळण्यासाठी तसेच प्रशासकीय कामात सकारात्मक बदल होण्यासाठी जिल्ह्यातील उपकेंद्रांचे ‘आयएसओ’ मानांकन करून घ्यावे. याकरता आवश्यक ती सर्व कार्यवाही करा, असे निर्देश संचालक राजेंद्र पवार यांनी दिले.
यावेळी ग्राहकसेवा व वीज बिल थकबाकीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षात थकबाकी लक्षणीयरीत्या कमी झाली पाहिजे. याकरता वसुली मोहिमा अधिक तीव्र करा, थकबाकीदार ग्राहकांशी समन्वय साधा त्यानंतर ही बिल भरणा न झाल्यास नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई करा, असे निर्देश त्यांनी दिले. थकबाकी वसूल झाली तरच महावितरणचे भविष्य सुरक्षित असेल, असे त्यांनी आवर्जून नमूद केले. कार्यरत इमारतींची दुरुस्ती, स्वच्छता व आवश्यक सुधारणा करून कर्मचाऱ्यांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्या अशा सूचना संचालक राजेंद्र पवार यांनी दिल्या. यावेळी बैठकीस जिल्ह्यातील महावितरणचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.