भारताच्या विकासासाठी स्वामी विवेकानंदांच्या कार्यापासून युवकांनी प्रेरणा घ्यावी
रत्नागिरी
युवकांना संघटित आणि प्रगल्भ बनवण्यासाठी स्वामी विवेकानंदांनी भरीव काम केले आहे. त्यामुळे भारताच्या विकासासाठी युवकांनी स्वामी विवेकानंदांच्या कार्यापासून प्रेरणा घ्यावी असे प्रतिपादन पश्चिम बंगाल येथील रामकृष्ण मिशन विवेकानंद शैक्षणिक व संशोधन संस्थेतील प्रा. डॉ गोपीकृष्ण रघु यांनी केले.
ते कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे (रामटेक) भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी संस्कृत उपकेंद्र येथे स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्य अतिथी रूपाने बोलत होते.
यावेळी डॉ. रघु म्हणाले की स्वामी विवेकानंदांनी युवाशक्तीचे मर्म ओळखले आणि त्याद्वारे देशाला आणि जगाला संदेश दिला. भाषणातून प्रभावीपणे त्यांनी आपला विचार मांडला. खासकरून त्यांना संस्कृत भाषेची विशेष आवड होती. असे ते म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राचे संचालक डॉ दिनकर मराठे यांनी केले. यावेळी त्यांनी स्वामी विवेकानंद आणि युवाशक्ती यांच्यावर भाष्य केले.
यानंतर कार्यक्रमात उपस्थित प्रा. गौरव शर्मा यांनी स्वामी विवेकानंदांनी केलेले कार्य युवकांना प्रेरणादायी आहे. त्यातून निश्चितच राष्ट्र उभारणी करता येऊ शकते, असे सांगितले.
यावेळी कार्यक्रमाला उपकेंद्रातील विद्यार्थी प्राध्यापक व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.