दापोलीतील वृद्ध महिलेचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू
दापोली: तालुक्यातील भानघर येथील एका ७३ वर्षीय वृद्ध महिलेचा मुंबईतील जे.जे. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. जयवंती बाळकृष्ण पवार असे या मृत महिलेचे नाव असून, अचानक उद्भवलेल्या प्रकृतीच्या तक्रारीमुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते.
याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, २८ डिसेंबर २०२५ रोजी जयवंती पवार यांना अचानक छातीत दुखू लागल्याने तातडीने दापोली येथील भागवत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना मुंबईतील सर जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले. ३० डिसेंबरपासून त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. मात्र, उपचारांना पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने अखेर ९ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
या घटनेची नोंद रत्नागिरी दापोली पोलीस दप्तरी करण्यात आली असून, बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पवार कुटुंबावर या घटनेमुळे शोककळा पसरली आहे.