कुवे येथे दुचाकीस्वारावर बिबट्याची झडप
नागरिकांत भीतीचे वातावरण
लांजा: बिबट्याने झडप घातल्याने मोटारसायकलस्वार तरुण जखमी झाल्याचा प्रकार कुवे- घोडखिंड येथे बुधवारी (ता. ७) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडला. सुदैवाने तरुण बालंबाल बचावला. योगेश सुधीर पवार (वय २६) असे जखमी तरुणाचे नाव आहे. योगेश याच्या हातापायाला दुखापत झाली असून त्याच्यावर लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घरी सोडले. बिबट्याच्या हल्ल्यामुळे कुवेमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन खात्याने या घटनेची दखल घेऊन बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी केली जात आहे.
याबाबत माहिती अशी, कुवे माळवाडी येथील योगेश सुधीर पवार बुधवारी सायंकाळी काम आटोपून रात्र नऊच्या सुमारास मोटारसायकलने घरी चालला होता. कुवे घोडखिंड येथे दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानकपणे त्याच्यावर झडप घातली. अचानक बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे मोटारसायकलस्वार योगेश घाबरला. मात्र प्रसंगावधान राखून बिबट्यापासून वाचवण्यासाठी त्याने स्वतःला मोटारसायकलवर झोकून दिले. पाठीवर असलेल्या बॅगेमुळे बिबट्याच्या हल्ल्यापासून तो बचावला. मात्र मोटारसायकल घसरल्याने तो जखमी झाला.
घटनेत योगेश याच्या हातापायाला गंभीर दुखापत झाली. त्याच्यावर लांजा ग्रामीण रुग्णालयात उपचार करून घरी सोडले. अशाप्रकारे बिबट्याने केलेल्या हल्ल्यामुळे कुवे गावांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन खात्याने या घटनेची दखल घेऊन बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी मोटारसायकलस्वारावर केली जात आहे.