गिम्हवणे उगवतवाडी येथे विवाहितेची आत्महत्या
दापोली : तालुक्यातील गिम्हवणे उगवतवाडी येथे एका २८ वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रिशा सुदेश वाडकर, असे मृत विवाहितीचे नाव आहे.
दापोली पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रिशा गेल्या दोन वर्षांपासून माहेरी दापोली येथे आई प्रतिभा मोरे यांच्यासोबत वास्तव्यास होत्या. त्यांच्या आई प्रतिभा मोरे या सुनेच्या प्रसूतीसाठी मागील ७ ते ८ दिवसांपासून मुंबई येथे गेल्या होत्या. त्यामुळे प्रिशा घरात एकट्याच होत्या.
सोमवारी (ता. ५ जानेवारी) सकाळी त्यांनी घराशेजारील विहिरीत उडी घेतल्याचा प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. विहिरीतून पाणी काढण्यासाठी गेलेल्या विहीर मालकाच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ दापोली पोलिसांना माहिती दिली.
पोलिस व स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना विहिरीबाहेर काढून उपजिल्हा रुग्णालय, दापोली येथे दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले. या घटनेची खबर मृत युवतीच्या नातेवाइकांनी दापोली पोलिस ठाण्यात दिली असून, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.