रत्नागिरीला हवी आधुनिक ‘फायर फायटिंग’ यंत्रणा
वाढत्या आगींच्या घटनांमुळे यंत्रणेवर ताण
रत्नागिरी : रत्नागिरी शहर आणि जिल्ह्याचा वाढता विस्तार पाहता, आपत्कालीन घटनांचा सामना करण्यासाठी येथे अधिक अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज निर्माण झाली आहे. शहरातील उंच इमारती, महामार्गावरील वायू गळती आणि ग्रामीण भागातील वणवे यांसारखी आव्हाने पाहता, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांसाठी उपयुक्त ठरेल असे प्रादेशिक स्तरावरील सुसज्ज केंद्र उभारण्याची मागणी जोर धरत आहे.
सद्यस्थितीत रत्नागिरी नगरपालिकेकडे दोन मोठे अग्निशमन बंब आणि दोन अग्निशमन बुलेट उपलब्ध आहेत. एमआयडीसीकडे आधुनिक वाहने असून, नुकतीच एक नवीन ‘फायर अँड रेस्क्यू व्हॅन’ दाखल झाली आहे. मात्र, सुमारे १ लाख १५ हजार लोकसंख्या असलेल्या या शहरात आणि ग्रामीण भागात एकाच वेळी दुर्घटना घडल्यास या यंत्रणेवर प्रचंड ताण येतो. विशेषतः लांजा किंवा राजापूरमध्ये दुर्घटना घडल्यास रत्नागिरीतूनच मदत पाठवावी लागते, ज्यामध्ये मौल्यवान वेळ वाया जातो.
रत्नागिरी शहरात अलीकडच्या काळात उंच इमारतींचे प्रमाण वाढले आहे. अशा इमारतींमध्ये आगीची घटना घडल्यास ती विझवण्यासाठी आवश्यक असलेली ‘हायड्रोलिक प्लॅटफॉर्म’ सारखी अत्याधुनिक उपकरणे स्थानिक यंत्रणेकडे उपलब्ध नाहीत. ही कमतरता भविष्यात मोठी जोखीम ठरू शकते.
रत्नागिरी तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत रासायनिक प्रकल्प कमी असले, तरी गोदामांना आग लागण्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच मुंबई-गोवा महामार्गावर होणारी वायू गळती रोखण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ आणि विशेष यंत्रणेची सातत्याने गरज भासते.
२०१८ मध्ये रत्नागिरीत दोन एकर क्षेत्रावर सुमारे १० कोटी रुपये खर्च करून भव्य अग्निशमन केंद्राची इमारत उभारण्यात आली आहे. जागा आणि इमारत उपलब्ध असली, तरी त्या ठिकाणी कोकणच्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यांना तातडीने सेवा देईल, अशी ‘हायटेक’ यंत्रणा आणि पुरेसे मनुष्यबळ तैनात करण्याची आवश्यकता आहे.