कस्टमर केअरच्या नावाखाली सेवानिवृत्त शिक्षकाची फसवणूक
रत्नागिरी:
ऑनलाईन खरेदी केलेल्या वस्तूचा परतावा (रिंफंड) मिळवण्यासाठी गुगलवर कस्टमर केअरचा नंबर शोधणे एका ज्येष्ठ नागरिकाला चांगलेच महागात पडले आहे. सायबर चोरट्यांनी ७७ वर्षीय सेवानिवृत्त शिक्षकाच्या बँक खात्यातून तब्बल ३ लाख ९२ हजार रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना उद्यमनगर परिसरात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उद्यमनगर येथील रहिवासी मदन नारायण भास्करे (वय ७७) यांनी ‘फ्लिपकार्ट’ या ॲपवरून तीन वस्तूंची ऑर्डर दिली होती. त्यापैकी एकच वस्तू आल्याने उर्वरित वस्तूंच्या रिफंडसाठी त्यांनी गुगल क्रोमवर फ्लिपकार्ट कस्टमर केअरचा क्रमांक शोधला. त्या क्रमांकावर संपर्क साधला असता, समोरील अज्ञात व्यक्तीने त्यांना ‘Customer Service App’ नावाचे एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले.
फिर्यादी भास्करे यांनी ते ॲप डाऊनलोड करताच त्यांचा मोबाईल हॅन्ग झाला. या संधीचा फायदा घेत सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाईलचा ताबा (अॅक्सेस) मिळवला. त्यानंतर फिर्यादी यांचे बँक ऑफ महाराष्ट्र (गोगटे जोगळेकर कॉलेज शाखा) येथील दोन वेगवेगळ्या खात्यांमधून प्रत्येकी १,९६,००० रुपये, असे एकूण ३ लाख ९२ हजार रुपये परस्पर काढून घेतले. यामध्ये त्यांच्या पेन्शन खात्यातील रकमेचाही समावेश आहे.
आपल्या बँक खात्यातून मोठी रक्कम गेल्याचे लक्षात येताच मदन भास्करे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. २१ आणि २२ डिसेंबर दरम्यान हा प्रकार घडला असून, या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम (IT Act) कलम ६६(क), ६६(ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे.