रत्नागिरीत पहिलीच फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धा
सप्रे स्मृती राज्य निवड स्पर्धा १६ ते १८ जानेवारीदरम्यान आयोजन
रत्नागिरी
एचटूई पॉवर सिस्टिम्स महाराष्ट्र राज्य निवड (अमेच्युअर गट) फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन १६ ते १८ जानेवारी दरम्यान रत्नागिरीत करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि केजीएन सरस्वती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा होणार आहे.
क्लासिकल टाइम कंट्रोल प्रकारात खेळवली जाणारी ही स्पर्धा रत्नागिरीच्या बुद्धिबळ इतिहासातील पहिलीच फिडे मानांकन स्पर्धा ठरणार आहे. माळ नाका येथील मराठा भवन मंगल कार्यालयात ही स्पर्धा पार पडणार आहे. भारताचे पहिले राष्ट्रीय बुद्धिबळ विजेते कै. रामचंद्र सप्रे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत विविध वयोगट, रेटिंग कॅटेगरी तसेच महिला व वरिष्ठ खेळाडूंसाठी रोख रक्कम व चषक स्वरूपात बक्षिसे देण्यात येणार आहेत.यापूर्वी या स्पर्धेत देश विदेशातील नामांकित बुद्धिबळपटूंनी विजेतेपद मिळवले आहे.
फिडे मानांकन हे कोणत्याही बुद्धिबळ पटूसाठी पुढील वाटचालीचा महत्त्वाचा टप्पा असल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील खेळाडूंनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष श्रीराम खरे यांनी केले आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी विवेक सोहनी व चैतन्य भिडे यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.