पार्किंगमधून ‘रॉयल एनफिल्ड’ लंपास
रसाळवाडी (नाचणे) परिसरातील घटना
रत्नागिरी (प्रतिनिधी):
शहरातील रसाळवाडी (नाचणे) परिसरात चोरट्यांनी आपला मोर्चा आता लक्झरी दुचाकींकडे वळवला आहे. एका अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केलेली ‘रॉयल एनफिल्ड’ (बुलेट) अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रसाळवाडी येथील ‘स्नेह संकुल’ अपार्टमेंटमध्ये राहणारे अमर अनंत म्हस्के (वय ३७, व्यवसाय- हॉटेल मॅनेजर) यांनी आपली काळ्या रंगाची रॉयल एनफिल्ड मोटारसायकल (क्र. एम.एच-०८/ए.एफ/१२००) नेहमीप्रमाणे इमारतीच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. २८ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ८:३० वाजल्यापासून ३ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजेपर्यंतच्या कालावधीत ही चोरी झाली.
मुलगा किंवा घरातील कोणीतरी गाडी नेली असेल, या समजातून सुरुवातीला चौकशी करण्यात आली, मात्र गाडीचा पत्ता न लागल्याने अखेर चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.
चोरून नेलेल्या बुलेटची किंमत सुमारे ४०,००० रुपये असून तिचा क्रमांक MH-08-AF-1200 असा आहे. या गाडीच्या हेडलाईटच्या वरच्या बाजूला मराठीत ‘जय भैरी’ आणि ‘महादेव’ अशी नावे रेडियमने लिहिलेली आहेत.
अमर म्हस्के यांनी दिलेल्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल केला आहे. रसाळवाडी आणि नाचणे परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्याचा शोध घेत आहेत.