आठवडा बाजारात ड्रग्ज विक्रीचा पर्दाफाश
तिघांना अटक, ज्युपिटर गाडीसह ९३ हजारांचा माल जप्त.
रत्नागिरी (प्रतिनिधी):
रत्नागिरी शहराच्या गजबजलेल्या आठवडा बाजार परिसरातील पार्किंगमध्ये अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तीन तस्करांना रत्नागिरी शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून ३ ग्रॅम ‘ब्राऊन हेरॉईन’ सदृश्य अंमली पदार्थ आणि एक दुचाकी, असा एकूण ९३ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पोलिसांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेत ही मोठी कारवाई केली आहे.
गुरुवारी, २ जानेवारी रोजी सायंकाळी ७:४० च्या सुमारास आठवडा बाजार येथील गाडी पार्किंगमध्ये काही इसम अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून तिघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे उग्र वासाचा ३ ग्रॅम ‘ब्राऊन हेरॉईन’ सदृश्य अंमली पदार्थ मिळून आला.
पोलिसांनी याप्रकरणी अजय उर्फ पप्पू प्रभाकर नाचणकर (वय ४६, रा. तेली आळी, रत्नागिरी), मुनाफ नुस्द्दीन वस्ता (वय ३७, रा. राजीवडा, काद्री मस्जिद जवळ, रत्नागिरी), अरसलान सिकंदर फणसोपकर (वय २५, रा. राजीवडा बांध, रत्नागिरी) या तिघांना अटक केली आहे.
या प्रकरणी १८,८०० रुपये किमतीचे ३ ग्रॅम ब्राऊन हेरॉईन, ७५,००० रुपये किमतीची निळ्या रंगाची टीव्हीएस ज्युपिटर दुचाकी (क्र. एम.एच.०८.ए.व्ही.१८२३) असा एकूण ९३,८०० रुपयांच माल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमित राघू पालवे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींविरुद्ध एन.डी.पी.एस. ॲक्ट १९८५ चे कलम ८(क), २१ (अ) आणि २९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३ जानेवारी रोजी पहाटे १:२८ वाजता या तिन्ही आरोपींना अधिकृतपणे अटक करण्यात आली.
शहरातील अमली पदार्थांचे जाळे मुळापासून उखडून टाकण्यासाठी रत्नागिरी पोलीस अधिक तपास करत असून, या तस्करांचे धागेदोरे कोणाशी जोडलेले आहेत, याचा शोध घेतला जात आहे.