कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले
पनवेलमधील ब्लॉक आणि विशेष गाड्यांचा फटका; ‘तेजस’ सव्वासात तास उशिराने
चिपळूण:
सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकण व गोव्याकडे निघालेल्या पर्यटकांना रेल्वेच्या विलंबाचा मोठा मनस्ताप सहन करावा लागला. पनवेल येथील रेल्वे ब्लॉक आणि उत्तर भारतातून येणाऱ्या विशेष गाड्यांच्या गर्दीमुळे कोकण रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले असून, अनेक गाड्या तासनतास उशिराने धावत आहेत.
मडगावहून मुंबईकडे येणारी तेजस एक्स्प्रेस मंगळवारी रात्री १२:३० वाजता पोहोचणे अपेक्षित होते, मात्र ही गाडी तब्बल सहा तास उशिराने म्हणजेच बुधवारी पहाटे ६:३० वाजता सीएसएमटी स्थानकात दाखल झाली. याचा परिणाम परतीच्या प्रवासावरही झाला. बुधवारी सकाळी ५:५० वाजता सुटणारी तेजस सकाळी ११ वाजता रवाना झाली. चिपळूण स्थानकात ही गाडी सव्वासात तास उशिराने पोहोचल्याने पर्यटकांच्या ‘थर्टीफर्स्ट’ सेलिब्रेशनच्या उत्साहावर विरजण पडले.
उत्तर भारतातून कोकणमार्गे गोव्याला जाणाऱ्या विशेष गाड्यांना प्राधान्य देण्यासाठी नियमित गाड्या बाजूला ठेवल्या जात असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. मध्य रेल्वेने पनवेलजवळ घेतलेल्या ब्लॉकमुळे या परिस्थितीत अधिकच भर पडली. लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या विलंबाचा परिणाम चिपळूण, रत्नागिरी आणि कणकवली अशा महत्त्वाच्या स्थानकांवर प्रवाशांना भोगावा लागला.
सणासुदीच्या आणि पर्यटनाच्या काळात रेल्वे प्रशासनाने योग्य नियोजन न केल्यामुळे प्रवाशांमध्ये मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या कुटुंबांना स्थानकांवर तासनतास वाट पाहावी लागली.
”कोकण रेल्वेच्या नियमित गाड्यांचे वेळापत्रक रेल्वे प्रशासनाने काटेकोरपणे पाळले पाहिजे. तेजस एक्स्प्रेसच्या जागी ‘वंदे भारत’ ट्रेन चालवण्यात यावी, जेणेकरून रेल्वे बोर्डाचे या गाडीकडे विशेष लक्ष राहील आणि रत्नागिरी, कुडाळसारख्या स्थानकांवरील प्रवाशांनाही जलद प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल.”
— अक्षय महापदी, (कार्यकर्ते, कोकण रेल्वे प्रवासी हक्क)