भालावली येथील जाकादेवी मंदिरात चोरी
दानपेटीसह रोकड लंपास
राजापूर: तालुक्यातील भालावली येथील प्रसिद्ध श्री जाकादेवी मंदिरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याने मंदिराच्या उघड्या आवारातून दानपेटी आणि त्यातील रोख रक्कम असा एकूण १०,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
याप्रकरणी सुहास सुदाम भोसले (वय ७० वर्ष, रा. भालावली वरचा भंडारवाडा, ता. राजापूर) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही चोरी २९ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी १८.३० ते ३० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ०७.०० वाजेच्या दरम्यान घडली. चोरट्याने मंदिरातील अंदाजे सव्वा फूट लांब, रुंद आणि उंच असलेली लालसर रंगाची चौरस आकाराची दानपेटी चोरली, ज्यामध्ये सुमारे १०,००० रुपयांची रोकड होती.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध ३० डिसेंबर रोजी दुपारी २. ३४ वाजता गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून मंदिर प्रशासनाने सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.